
कर्जत तालुक्यातील राशीन–सोनाळवाडी रस्त्याचे काम कंत्राटदार एस. पी. देवकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत ठेवले असून रस्ता उकरून ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित कंत्राटदारांना अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधून काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र आज करतो, उद्या करतो अशी आश्वासने देण्यात येत असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे. तरीही गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था कायम आहे.

दरम्यान शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा वाढली आहे. अनेक लहान मुले सायकलवरून शाळेत जात असल्याने उकरलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे किंवा किमान उकरलेला रस्ता त्वरित बुजवून वाहतुकीस सुरक्षित करावा अशी मागणी सोनाळवाडीचे सरपंच बाळासाहेब काळे यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

