
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील शिवसम्राट हॉटेलजवळून टाटा ४०७ वाहनातून चोरीला गेलेल्या सुमारे ३ लाख रुपयांच्या ठिबक पाईप चोरीचा छडा लावण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे ठिबक पाईप आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण १९ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश किसन वाघुले (वय ३५, रा. आळकुटी, ता. पारनेर) यांच्या ताब्यातील टाटा ४०७ वाहनात २ लाख ९९ हजार २४९ रुपये किमतीचे १६ आणि २० एमएमचे २४२ ठिबक पाईपचे बंडल होते. ७ जून अज्ञात इसमांनी हे बंडल चोरून नेले होते. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी तांत्रिक बाबींची पडताळणी आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी केली. या तपासातून गुन्ह्यातील ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी ऋतुराज रणजित सोनवणे (वय २२, रा. सणसर भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे), अमोल तान्हाजी साळुंखे (वय २३, रा. राऊतनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि आकाश अशोक हदिमनी (वय २०, रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर जनार्धन विलास लोखंडे (रा. यशवंत नगर अकलूज), अक्षय किसन सोनवणे (रा. सणसर, जि. पुणे) आणि विजू शिंदे हे तिघे फरार आहेत.

अटक केलेल्या आरोपींची सविस्तर चौकशी करून पोलिसांनी १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे १६ व २० एमएमचे एकूण १२२ ठिबक पाईपचे बंडल, ८ लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची फ्रॉन्स चारचाकी आणि १० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विटकरी रंगाचा आयशर टेम्पो असा एकूण १९ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा आणि चोरीला गेलेल्या उर्वरित मालाचा शोध घेत असून, पुढील अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.
ही धडक कामगिरी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, विशाल क्षिरसागर, प्रकाश दंदाडे, अमोल रायकर, किरण बोऱ्हाडे, किरण जाधव, सचिन थोरात, नानासाहेब वाघमारे, वैभव गांगर्डे तसेच मोबाईल सेल विभागाचे राहुल गुंडू व अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.

