कनिष्ठ अभियंता संतोष शेळके यांच्याकडून विद्यालयास २०० रोपांची भेट

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात कनिष्ठ अभियंता संतोष दत्तात्रय शेळके यांनी शाळेला कोनोकार्पस २०० रोपे भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना या वृक्षाची वैशिष्ट्ये, त्याचे पर्यावरणीय महत्त्व तसेच रोपांचे योग्य संगोपन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करावे असे आवाहन त्यांनी केले.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत तुकाराम महाराजांच्या ओळीचा संदर्भ देत वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरण संतुलन राखण्यात त्यांची भूमिका आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव निशिकांत भैलूमै, मुख्याध्यापक बाळासाहेब वाघ, रामदास काळे तसेच शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.