
भारतीय जनता पार्टी, कर्जत यांच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ पांडुरंग धोदाड, रा. कुंभेफळ यांनी गट क्रमांक १७६ मधील ०.८१ आर क्षेत्र दि. ४ मे २०२६ रोजी नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कायदेशीररित्या खरेदी केले होते. या खरेदीवरून फेरफार नोंदीसंदर्भात हरकत दाखल झाल्याने महसूल विभागासमोर सुनावणी सुरू आहे.

मात्र यापूर्वीपासून जमिनीच्या बांधावरून ॲड. संदीप शिवदास पाटील व चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ धोदाड यांच्यामध्ये भावकीतील वाद सुरू असून या वादाचा सूड घेण्यासाठी ॲड. संदीप शिवदास पाटील यांनी वकील संघटनेच्या प्रभावाचा गैरफायदा घेत धोदाड कुटुंबीयांवर खोटे, बनावट व सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. विशेष म्हणजे ॲड. संदीप शिवदास पाटील यांनी चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ धोदाड यांच्या गळ्याभोवती फास आवळून जीवे मारण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केल्याची अत्यंत गंभीर बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली.
भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अन्वये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की कायद्याच्या ज्ञानाचा दुरुपयोग करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने शासन व्हायलाच हवे. वकिलाच्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी होणे अपेक्षित असताना तेच कायदेशीर ज्ञान निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी वापरले जाऊ नये अन्यथा न्यायव्यवस्थेवरील आणि वकील पेशावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपुष्टात येईल असा गंभीर इशारा पदाधिकाऱ्यांनी या निवेदनातून प्रशासनाला दिला.
भारतीय जनता पक्षाने वकील संघटनेबद्दल पूर्ण आदर व्यक्त करत स्पष्ट केले की कर्तव्य बजावताना एखाद्या वकिलावर खरोखर हल्ला झाल्यास त्याला कायद्याचे पूर्ण संरक्षण मिळालेच पाहिजे यावर दुमत नाही. मात्र संघटनेचे नाव व प्रभाव वापरून सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करणे ही त्या सन्माननीय संघटनेचीच बदनामी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ठामपणे नमूद केले. निवेदनाच्या शेवटी प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, सर्व तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांची सखोल पडताळणी व्हावी, खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावेत, आणि खोटी तक्रार दाखल करणाऱ्या ॲड. संदीप शिवदास पाटील यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करावा. कलम ३०७ अंतर्गत गुन्हा करण्यात आलेल्या सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.
न्याय हा केवळ दोषींना शिक्षा देण्यात नसून निरपराध व्यक्तींना अन्यायापासून संरक्षण देण्यातही आहे असे सांगत पार्टीने प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली.

