कर्जत तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी दादासाहेब भोसले पाटील यांची निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या आळंदी येथे दि. १७ जून २०२६ रोजी झालेल्या वार्षिक आढावा बैठकीत कर्जत तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी सिद्धटेक बेर्डी येथील आदर्श पोलीस पाटील तथा राज्यपाल पुरस्काराने सन्मानित दादासाहेब भोसले पाटील यांची निवड करण्यात आली.

राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या हस्ते भोसले पाटील यांना तालुकाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव कळमकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खजिनदार पाटील, संतोष शिंदे पाटील, राम शिंदे पाटील, विविध तालुक्यांचे अध्यक्ष तसेच राज्यभरातील हजारो पोलीस पाटील उपस्थित होते.

नियुक्तीनंतर बोलताना दादासाहेब भोसले पाटील यांनी सांगितले की, राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या घटनेनुसार सामान्य पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्याने काम केले जाईल. कर्जत तालुक्यातील पोलीस पाटलांचा सन २०१२ पासून प्रलंबित असलेला प्रवास भत्ता मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच येत्या सात दिवसांत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.