कर्जतच्या शरद काळे यांचा राष्ट्रीय सन्मान; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शॉप्शनला ‘स्टार्टअप लीडरशिप अवॉर्ड

कर्जत : प्रा. किरण जगताप

भारतीय कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शॉप्शन प्रा. लि. पुणे या अग्रगण्य ॲग्रीटेक कंपनीला ॲग्रिकल्चर टुडे कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये प्रतिष्ठेचा ‘स्टार्टअप लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शरद रामदास काळे मूळचे कर्जत तालुक्यातील असून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला.

हा पुरस्कार भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, गुजरातचे कृषिमंत्री राघवजी पटेल तसेच कृषी, उद्योग आणि सार्वजनिक जीवनातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद काळे हे २०१३ चे पुणे विद्यापीठाचे सॉफ्टवेअर इंजिनिअर शाखेतील गोल्ड मेडलिस्ट आहेत. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आपल्या पहिल्या कंपनीची स्थापना केली आणि तेथून त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्याच्या ध्येयातून त्यांनी पुढे शॉप्शनची स्थापना केली.

तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि देशभर उभारलेल्या मजबूत डीलर नेटवर्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार कृषी उत्पादने व आधुनिक उपाय पोहोचवून भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल शॉप्शनला हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरद काळे म्हणाले, हा सन्मान आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा, डीलरचा, गुंतवणूकदाराचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा आहे. हा गौरव भारतीय शेतीसाठी अधिक प्रभावी, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत उपाय विकसित करण्याची प्रेरणा देणारा आहे.

सध्या शॉप्शन ही कंपनी देशातील २५ राज्यांमध्ये कार्यरत असून ५५ हजारांहून अधिक कृषी विक्रेत्यांच्या नेटवर्कद्वारे सिंचन, कृषी यांत्रिकीकरण आणि विविध कृषी उत्पादनांच्या क्षेत्रात सेवा पुरवत आहे. कंपनीच्या GBRU या ब्रँडअंतर्गत ३५० हून अधिक कृषी उत्पादने उपलब्ध असून ती देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. या राष्ट्रीय सन्मानामुळे भारतीय शेती अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरी-केंद्रित बनविण्याच्या शॉप्शनच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाल्याची भावना कंपनीने व्यक्त केली.