चांदे बुद्रुक विविध सहकारी सोसायटी बँकेचा ठराव सभापती राम शिंदे यांच्या बाजूने

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या चांदे बुद्रुक गावात भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे या गावात राजकीय वर्चस्व असून त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. मात्र गावपातळीवर भारतीय जनता पक्षाचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत आहेत.

एका बाजूला सभापती राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच कर्जत तालुका भाजपचे चिटणीस भाऊसाहेब गावडे यांचा गट असून दुसऱ्या बाजूला मार्केट कमिटीचे संचालक नंदकुमार नवले आणि माजी सरपंच अरुण लामटुळे यांचा गट सक्रिय आहे. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणाऱ्या संस्थेमध्ये दोन गट पडून एका गटाकडे सहा व एका घराकडे पाच सदस्य राहिले होते.

सोसायटीच्या बैठकीवेळी भाऊसाहेब गावडे यांच्यासोबत सहा संचालक सहलीसाठी बाहेरगावी गेल्याने नंदकुमार नवले व अरुण लामटुळे यांच्या गटाकडे केवळ पाच सदस्य उपस्थित होते. त्यामुळे कोरमअभावी २ जुलै २०२६ रोजीची सभा तहकूब करण्यात आली.

त्यानंतर भाऊसाहेब गावडे यांनी रणनीती आखत ७ जुलै २०२६ रोजी तहकूब सभेचे आयोजन केले. या सभेत गहीनाथ किसन जगताप यांची बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड करण्यात आली. या ठरावाचे सूचक भाऊसाहेब सोपान गावडे, तर अनुमोदक तात्याराम नंदराम सूर्यवंशी होते.

विशेष म्हणजे या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कट्टर समर्थक सतीश लाघुडे यांनीही सहकार्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे चांदे बुद्रुकमधील गावपातळीवरील राजकारणाला नवे वळण मिळाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.