कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील करमाळा रोडवरील एका फर्निचर दुकानासमोर कर्जत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ३०० किलो गोमांस आणि एक इर्टिगा कार असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सहायक फौजदार अण्णासाहेब चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, करमाळा येथून गोवंशाची कत्तल करून त्याचे गोमांस विक्रीसाठी मारुती सुझुकी इर्टिगा या वाहनातून कर्जतकडे आणले जात आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण सुतार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर, सचिन झुनगुरे, गोविंद हिंगे व पोलिसांच्या पथकाने करमाळा रोडवर सापळा लावला.

दरम्यान, संशयित इर्टिगा कार ( एमएच १६, डीएस ३७२२) तेथे आल्यानंतर पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये सात प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये काळ्या प्लास्टिकमध्ये पॅक केलेले सुमारे ३०० किलो गोमांस आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचे गोमांस आणि ६ लाख रुपये किमतीची इर्टिगा कार असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत सैफाली मुहम्मद हफिज कुरेशी, वय ३२ वर्षे, रा. मौला अलीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर व नागनाथ मच्छिंद्र देवकर, वय ४५ वर्षे, रा. शिंदे गल्ली, करमाळा, जि. सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान ते गोमांस विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.