कर्जत बसस्थानकावरून मारुती सुझुकी कारची चोरी; तिघांवर गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत बसस्थानक परिसरातून कार चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमताने कारची चावी चोरून ही धाडसी चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी रवी अर्जुन चाळक, वय ३० वर्षे, रा. तुरा, ता. पाथरी, जि. परभणी हे बीड येथून अनिल पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना गाडी भाड्याने कर्जत येथे घेऊन आले होते. अनिल पवार हे वादाच्या तक्रारीसाठी कर्जत पोलीस ठाण्यात आले होते.

पोलीस ठाण्यातील काम पूर्ण करून कर्जत बस स्टॅन्ड येथे आले. फिर्यादी चाळक हे मारुती सुझुकी कारजवळ ( एमएच १२, जीव्ही ७१८१) असताना तिथे काही लोक जमा झाले आणि त्यांनी पुन्हा भांडण सुरू केले.

हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, आरोपी सोन्या उर्फ रोहित दीपक काळे (रा. नांदगाव), जय किरण पवार (रा. पाटेवाडी) आणि पिया अक्षय उर्फ आलेश भोसले (रा. कर्जत) यांनी फिर्यादीच्या खिशातील कारची चावी चोरली. त्यानंतर, फिर्यादीच्या संमतीशिवाय तिन्ही आरोपींनी सदर कारमध्ये बसून ती तेथून पळवून नेली. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने, फसवणूक झाल्याची खात्री पटताच फिर्यादीने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. चोरीस गेलेल्या कारची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ भिताडे करत आहेत.