राशीन- बारामती राज्यमार्गावर रास्ता रोको

कर्जत : प्रा. किरण जगताप

राशीन परिसरातील १५ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खेड उपकेंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या विद्युत वाहिनीच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ चार पोल उभारण्यास व रस्ता क्रॉसिंगसाठी परवानगी दिली असताना, प्रत्यक्षात ३०० हून अधिक पोल उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी हनुमंत सुळ यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी केला.

या प्रकरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी राशीन- बारामती राज्यमार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कृष्णा ठाकरे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी, “२७ जुलैपर्यंत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सर्व मागण्यांवर निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत रामसन सोलर कंपनीकडून राशीन-बारामती राजमार्गावर पोल उभारण्याचे काम बंद ठेवण्यात येईल,” असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

मात्र, २७ जुलैपर्यंत प्रशासनाने लेखी निर्णय न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, रामसन सोलर प्रकल्प कंपनीने आवश्यक परवानगी न घेता बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ROW नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे लोखंडी पोल उभारले आहेत. तसेच, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ३०० हून अधिक पोल उभारण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

या आंदोलनात शेतकरी हनुमंत सुळ यांच्यासह अनिल लष्करे, कैलास कायगुडे, श्रीकांत सायकर, डॉ. विलास राऊत, सचिन काळे, मयूर सुळ, शफी सय्यद, हनुमंत भांडवलकर, नवनाथ सुळ, नवनाथ सायकर, वाल्मीक सायकर, सचिन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी मंडळ अधिकारी बाबू होगले, तलाठी विकास सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कृष्णा ठाकरे आणि पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब चव्हाण यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत चोख बंदोबस्त ठेवला. रास्ता रोको आंदोलनामुळे राजमार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.