
माळढोक पक्षी अभयारण्य हद्दीत कर्जत तालुक्यातील थेटेवाडी येथे संरक्षित घोरपडींच्या बेकायदेशीर शिकारीविरोधात वन विभागाने धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली, तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. अजय बबन जाधव (वय २७), संदीप अशोक जाधव (वय २८) आणि सूरज अशोक जाधव (वय २१) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड येथील आहेत.
आरोपींकडून जखमी अवस्थेतील तीन जिवंत घोरपडींची सुटका करण्यात आली असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत यांनी तिन्ही आरोपींना २७ जुलैपर्यंत वन विभागाची कोठडी सुनावली आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास संरक्षण मजूर आदेश गायकवाड हे थेटेवाडी येथील संरक्षित गट क्रमांक ८३ व ८४ मध्ये नियमित गस्त घालत असताना चार इसम दोन कुत्र्यांच्या सहाय्याने अभयारण्यात बेकायदेशीर प्रवेश करून घोरपडींचा शोध घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे इसम दगड व गोटे बाजूला करून घोरपड बाहेर काढत होते. घोरपड बाहेर पडताच कुत्र्यांच्या सहाय्याने तिला पकडून बारदानाच्या पिशवीत टाकत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. याबाबतची माहिती त्यांनी तातडीने बीट वनरक्षक सागर वाकचौरे यांना दिली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत गो. उगले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व शिकार प्रतिबंधक पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयितांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान तीन प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली, तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून एक लहान व दोन मोठ्या अशा तीन जिवंत जखमी घोरपडी, शिकारीसाठी वापरण्यात आलेले दोन कुत्रे, चार स्मार्टफोन, एक पहार, एक कत्ती आणि एक बारदानाची पिशवी जप्त करण्यात आली. घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात आली. पशुवैद्यकीय तपासणीत घोरपडींच्या शरीरावर विविध प्रकारच्या जखमा आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार करून पुनर्वसनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य व तपासाची आवश्यकता लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या गुन्ह्यातील एक आरोपी विधी संघर्षित बालक असल्याने त्याच्याविरुद्ध किशोर न्याय अधिनियम, २०१५ मधील तरतुदीनुसार स्वतंत्र कार्यवाही करण्यात येत आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, पुणे केशव वाबळे, विभागीय वन अधिकारी संदीप गवारे तसेच सहाय्यक वनसंरक्षक, माळढोक पक्षी अभयारण्य प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत उगले, वनपाल सचिन गांगर्डे, बीट वनरक्षक सागर वाकचौरे, वनरक्षक दिनकर लिलके, वनरक्षक पिंटू बिटके तसेच शिकार प्रतिबंधक पथकातील आदेश गायकवाड, केतन सकट, शाहरुख शेख आणि केशव बनसोडे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
वन्यजीवांची शिकार करणे, संरक्षित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करणे अथवा वन्यजीवांना इजा पोहोचविणे हा गंभीर व शिक्षापात्र गुन्हा असून अशा प्रकारच्या घटना किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

