राशीन- भिगवण मार्गावर भीषण अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन- भिगवण मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार संदीप जगताप, रा. तवलवाडी, ता. आष्टी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राशीन- भिगवण रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ स्कॉर्पिओ आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार संदीप जगताप यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य केले.

घटनेची माहिती मिळताच राशीन येथील शेखर जाधव यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

या दुर्दैवी घटनेमुळे तवलवाडी गावासह परिसरात शोककळा पसरली असून संदीप जगताप यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि फरार चालकाची ओळख तपासाअंती स्पष्ट होणार आहे.