कर्जतमध्ये वकीलासह तिघांविरुद्ध धमकी, खंडणी व बनावट कागदपत्रप्रकरणी गुन्हा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील गट क्रमांक १७६ मधील जमीन व्यवहारावरून वाद निर्माण झाल्याने धमकी, खंडणी आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत कर्जत पोलीस ठाण्यात वकीलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत पोलीस ठाण्यात दि. २९ जुलै २०२६ रोजी पूनम हिरालाल गायकवाड, रा. हिंगणी, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी संदीप शिवदास पाटील, महेंद्र शांतीलाल धोदाड आणि विजय सुनील पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३६, ३३८, ३१८(४), ३४०, ३५२ व ३(५) अंतर्गत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कुंभेफळ येथील गट क्रमांक १७६ मधील ८१ आर क्षेत्रफळाची जमीन ही पूनम हिरालाल गायकवाड व त्यांची बहीण वृषाली योगेश सराटे यांच्या मालकीची होती. त्यांनी दि. ४ मे २०२६ रोजी सदर जमीन चरपटीनाथ ऊर्फ पप्पूशेठ पांडुरंग धोदाड यांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कायदेशीररीत्या विकली.

या व्यवहारावरून आरोपींनी आक्षेप घेत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, सुमारे वर्षभरापूर्वी संदीप पाटील यांच्याकडून २ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम एका महिन्याच्या आत रोख स्वरूपात परत केल्यानंतरही, जमीन मला का विकली नाही, मागील ऑनलाइन व्यवहाराच्या आधारे न्यायालयात दावा दाखल करीन अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीनुसार, या दबावामुळे पुन्हा दोन लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात देण्यात आले. अशा प्रकारे एकूण ४ लाख रुपये संदीप पाटील यांना देण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. यानंतरही वकिलामार्फत तब्बल २२ लाख रुपयांची मागणी करणारी नोटीस पाठविण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय आरोपींनी बनावट बयाणा किंवा साठेखत तयार करून खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे सदर जमिनीवर हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच फिर्यादीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीने असा दावा केला की, या प्रकरणातील आरोपी महेंद्र शांतीलाल धोदाड हे कर्जत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शांतीलाल धोदाड यांचे पुत्र आहेत. तसेच यापूर्वी याच वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणात वकील संदीप पाटील यांनी वकील संघटनेतील सदस्यांना अंधारात ठेवून चरपटीनाथ ऊर्फ पप्पूशेठ धोदाड यांच्याविरोधात खोटा पोक्सो गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत असून गुन्ह्यातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आरोपींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

– राहुल अडसूळ, प्रतिनिधी