
कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून एका तरुणावर खोरे, लाकडी दांडा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी खंडू रमेश काळे, रा. चापडगाव, ता. कर्जत यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी हनुमंत राजेंद्र बेद्रे, योगेश निळकंठ बेद्रे आणि राजेंद्र निवृत्ती बेद्रे, सर्व रा. चापडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी खंडू काळे कृषी दुकानातील काम आटोपून घराकडे जात असताना आरोपी घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कोबा करत होते. रस्त्याच्या कडेला व्यवस्थित काम करून घ्या, आम्हाला ये-जा करण्यास अडचण नको, असे सांगितल्याचा राग आरोपींना आला. त्यानंतर हनुमंत राजेंद्र बेद्रे यांनी शिवीगाळ करत हातातील खोऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. तसेच योगेश निळकंठ बेद्रे यांनी लाकडी दांड्याने पाठ व पायावर मारहाण केली, तर राजेंद्र निवृत्ती बेद्रे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी ‘पुन्हा रस्त्याबाबत बोललास तर जीवे मारून टाकू,’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर परिसरातील गणेश रमेश काळे, ऋषिकेश शिंदे व शरद शिंदे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. त्यानंतर जखमीस उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

