कर्जत– नांदगाव– शिंदा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा

कर्जत : प्रा. किरण जगताप

अन्यथा शिवसेना करणार आंदोलन

कर्जत–नांदगाव–शिंदा या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, व्यावसायिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यांचीही दुरवस्था झाल्याने अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कर्जत शहर प्रमुख दीपक मांडगे यांनी केली आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक, व्यापारी वर्गाची ये-जा तसेच विद्यार्थ्यांचा प्रवास होत असतो. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेल्या साईड पट्ट्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून लहान-मोठे अपघात वारंवार घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दीपक मांडगे यांनी संबंधित विभागाला इशारा देत सांगितले की, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून साईड पट्ट्यांची दुरुस्ती करण्यात यावी. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने या मागणीची त्वरित दखल घेऊन कर्जत–नांदगाव–शिंदा मार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करावी अशी मागणी दीपक मांडगे यांनी केली आहे.