
कर्जत शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदेव राऊत यांनी या निर्णयाला विरोध करत निवेदनाद्वारे व्यावसायिकांची पाठराखण सुरू केली असून, प्रशासनाने सर्वांची बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी भूमिका घेतली आहे. यावर भाजपचे नेते सुनील यादव यांनी नामदेव राऊत यांच्यावर टीका केली आहे.

“नामदेव राऊत, तुम्ही एवढे दिवस झोपा काढत होते का? तुम्ही नगराध्यक्ष असताना नेमके काय केले? एकही प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही. आता सर्वांनी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोध का?” असा सवाल सुनील यादव यांनी केला.

यादव पुढे म्हणाले की, रोहित पवारांचे ऐकून कर्जतची चांगली माणसे आता बिघडू लागली आहेत. नामदेव राऊतही रोहित पवारांच्या नादी लागून चुकीची भूमिका घेत असून त्यांना कर्जतचा विकास नको आहे.
टपरीधारकांनी बेरोजगार व्हावे, असे आमचे म्हणणे नाही. त्यांना नवीन बांधलेले गाळे द्यावेत. मात्र ५०-१०० मतांसाठी कर्जत शहरात येणाऱ्या नागरिकांचे हाल केले जात आहेत. तालुक्यातून येणाऱ्या लोकांना वाहतूक समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेगवेगळ्या भागातून शिक्षणासाठी कर्जतमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वाहतुकीच्या कोंडीमुळे मोठा त्रास होत आहे, याचा विचार तुम्ही करणार आहेत का ? असा सवालही यादव यांनी उपस्थित केला आहे.
“नामदेव राऊत, तुमच्या काळात तुम्हाला काहीच करता आले नाही. आता सर्वांनी अतिक्रमणे हटविण्याची मागणी करून निर्णय घेतला आहे, तर तुम्ही त्यांची पाठराखण करत त्यांना उपोषण करायला शिकवत आहात. ही सगळी बुद्धी रोहित पवार यांची आहे. कर्जतची बारामती करणार होते, बारामतीचे रस्ते मोठे आहेत, मग कर्जतमधील रस्ते मोठे का होऊ देत नाहीत?” असा सवालही यादव यांनी उपस्थित केला.
कर्जतमधील काही नेते आता बारामतीवरून फिरणाऱ्या सूत्रांनुसार पोपटासारखे बोलू लागले आहेत. चुकीची भूमिका घेऊन तालुक्यातील जनतेचा विरोध वाढवून घेऊ नका, असा सल्लाही सुनील यादव यांनी नामदेव राऊत यांना दिला आहे.

