
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या कर्जत तालुकाध्यक्षपदी रघुनाथ (आबा) तुकाराम काळदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सिताराम काकडे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र अहमदनगर येथील पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा. सिताराम काकडे व खासदार निलेश लंके यांच्या हस्ते काळदाते यांना देण्यात आले.

काळदाते यांनी २००४ मध्ये शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रभावित होऊन तत्कालीन जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून पक्षीय राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर माळढोक पक्षी जमीन आरक्षणाच्या विरोधातील आंदोलन, २०१२ मधील भीषण दुष्काळात चारा छावण्यांसाठीचे आंदोलन, विविध मागण्यांसाठीची आंदोलने, दोन दिवसांचे उपोषण, सिना आवर्तनासाठीची आंदोलने, कर्जमाफीतील अटी रद्द करण्यासाठी पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांच्यासोबत केलेले तीन दिवसीय अन्नत्याग उपोषण यामध्ये त्यांनी सहभाग घेतला.

तसेच संभाजीनगर येथील आंदोलन, कांदा भाववाढीसाठी चांदवड-नाशिक येथील आंदोलन, एसटी डेपोसाठीची आंदोलने व एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात त्यांनी सहभाग घेतला. एमआयडीसी बचाव कृती समितीच्या माध्यमातून ३० ते ३५ गावांमध्ये जनजागृती दौरा, तसेच स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील ११८ व जामखेड तालुक्यातील ४६ गावांमध्ये पक्षाच्या विचारांचा प्रचार केला.
काळदाते यांनी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ८ वर्षे आणि जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ८ वर्षे काम केले आहे. गेल्या २२ वर्षांपासून पक्ष संघटना बांधणी, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच जनतेच्या विविध प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये ते सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर कर्जत तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

