
कर्जत तालुक्यातील मेडिकल स्टोअर्स व हॉस्पिटलमध्ये औषधांची खरेदी, साठवणूक, विक्री व वापर शासनाच्या नियमानुसार होतो का, याची विशेष तपासणी करून नियमभंग आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.

मेडिकल स्टोअर्सचे वैध औषध विक्री परवाने, परवान्याच्या अटी, नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती आणि प्रिस्क्रिप्शनवरील औषधांची विक्री यांची तपासणी करावी. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री न करता येणाऱ्या विशेष औषधांच्या विक्रीची आवश्यक नोंद ठेवली जाते का, याचीही पडताळणी करण्याची मागणी आहे.

औषधांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून झाली आहे का, खरेदी-विक्री बिले व नोंदी, प्रत्यक्ष साठा, बॅच क्रमांक आणि उत्पादकाची माहिती यांचा ताळमेळ तपासावा. मुदत संपलेली, बनावट किंवा भेसळयुक्त औषधे आढळतात का, तसेच औषधांची योग्य तापमान, प्रकाश व आर्द्रतेच्या अटींनुसार साठवणूक होते का, याची तपासणी करावी.
हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी अधिकृत स्रोतांकडून झाली आहे का, उपलब्ध साठा, बिले, बॅच क्रमांक, मुदत आणि वापर यांची तपासणी करावी. कर्जत तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल किंवा संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही मेडिकलवर २४ तास सेवा देत असल्याचे फलक असतानाही प्रत्यक्षात रात्री सेवा पुरवली जात नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून, अशा मेडिकलची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी आहे. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यवाही पूर्ण करून त्याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी असून, कार्यवाही न झाल्यास अहिल्यानगर येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर आप्पा अनारसे, प्रा. किरण जगताप, दादा राऊत, कमलाकर शेटे व आदींच्या सह्या आहेत.

