
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे सालाबादप्रमाणे नारळी पौर्णिमेनिमित्त श्री कोरेश्वर महाराज रथयात्रा उत्सवाचे गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरण, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीने संपूर्ण कोरेगाव परिसर भक्तिमय झाला होता.

या रथयात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते नर्तकीचे मनमोहक नृत्य. हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय यात्रेत विविध प्रकारचे आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, महिलांसाठी विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने व आकर्षक वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. खवय्यांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने यात्रेला आलेल्या नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.

श्री कोरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी तसेच रथयात्रेचा उत्सव अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे कोरेगाव परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान उत्सवाची रंगत आणखी वाढविण्यासाठी शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात नामांकित मल्लांच्या चुरशीच्या लढती पाहण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी

