
कर्जत तालुक्यातील नियमभंग करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स व हॉस्पिटलची विशेष तपासणी करण्याची मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर काही मेडिकल चालकांच्या बुडाला चांगलीच आग लागल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची लूट करणाऱ्या मोजक्या मेडिकल चालकांनी या तक्रारीची धास्ती घेत कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे.

कार्यकर्त्यास फोन करून ‘तुम्ही हे पैशासाठी करता का?’, ‘तुमच्याकडे कोणाची तक्रार आहे का ?’, ‘तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा न करता तक्रार का दिली ?,’ अशा स्वरूपाची विचारणा केली जात असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र, मेडिकल चालकांचा कारभार नियमाप्रमाणे असेल तर तपासणीच्या मागणीने एवढी धास्ती का, असा थेट सवाल युक्रांदने केला आहे.

मेडिकल स्टोअर्सचे वैध औषध विक्री परवाने, नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती, औषधांची खरेदी-विक्री बिले, उपलब्ध साठा, बॅच क्रमांक, मुदत आणि औषधांची योग्य साठवणूक होते का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी अधिकृत स्रोतांकडून झाली आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी आहे.
काही मेडिकलवर २४ तास सेवा देत असल्याचे फलक असतानाही प्रत्यक्षात रात्री सेवा पुरवली जाते किंवा नाही, याची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुदत संपलेली, बनावट किंवा भेसळयुक्त औषधे आढळतात का, तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता न येणाऱ्या औषधांच्या विक्रीची आवश्यक नोंद ठेवली जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी आहे.
आरोग्य सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचा चंग युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळ करून गैरमार्गाने मेडिकल दुकाने चालविणाऱ्यांना दोरीत आणण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी
युक्रांदने केली आहे.


