
रुग्णालयात येणारा माणूस आधीच अडचणीत असतो. त्याला स्वतःच्या आजाराची चिंता असते आणि आपल्या माणसाला काय झाले आहे, याची नातेवाईकांना काळजी असते. अशावेळी डॉक्टरांकडून योग्य उपचार मिळतील, अशी त्याची अपेक्षा असते. डॉक्टरांनी सांगितलेली माहिती तो विश्वासाने स्वीकारतो. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते खूप महत्त्वाचे असते. या नात्यात डॉक्टरांची जबाबदारी मोठी असते. हा विश्वास कायम ठेवून रुग्णसेवा केली तर डॉक्टरकीला खरा अर्थ प्राप्त होतो. मात्र या विश्वासाला तडा जाईल, असे काही प्रकार घडत असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

रुग्णाला मोठ्या आजाराची भीती दाखवणे, गरज नसताना अनेक तपासण्या सांगणे, महागडी औषधे लिहून देणे, उपचाराच्या नावाखाली अवाजवी पैसे घेणे, ठरावीक लॅबमध्ये तपासण्या करण्यास सांगणे आणि त्यातून टक्केवारी घेतली जात असल्याचे आरोपही डॉक्टरांवर अनेकदा होतात. हे आरोप खरे आहेत की नाही, याची चौकशी झाली पाहिजे. पण अशा तक्रारी सातत्याने समोर येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष होणार नाही.

आज सामान्य कुटुंबाला उपचाराचा खर्च परवडणे कठीण झाले आहे. घरातील एखादा माणूस मोठ्या आजाराने रुग्णालयात दाखल झाला की काही दिवसातच मोठ्या रकमेचे बिल समोर येते. लोकांचे बचत केलेले पैसे संपून जातात, त्यांना कर्ज घ्यावे लागते. काही वेळा शेती, जमीन, दागिने विकण्याची वेळ येते. अशा वेळी रुग्णाला खरोखर आवश्यक असलेल्या उपचारांपेक्षा वाढीव पैसे घेतले जात असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक तपासणी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक करूनच घेतात. रुग्णाला धोका होऊ नये, ही त्यांची मानसिकता असते. कोणतीही तपासणी रुग्णाला का आवश्यक आहे, त्याला दुसरा पर्याय आहे का, याची माहिती त्यांना नसते. डॉक्टरांनी सांगितले म्हणजे गरजेचीच असेल, असे त्यांना वाटते. त्यामुळे या विश्वासाचा गैरफायदा घेऊन अनावश्यक तपासण्या किंवा उपचार केले जात असतील तर रुग्णाची आर्थिक अडचण वाढवण्याचे कामच होते.
डॉक्टर होण्यापूर्वी अनेक विद्यार्थी रुग्णसेवेची स्वप्ने पाहतात. समाजासाठी काम करायचे, गरजू लोकांना मदत करायची, असे त्यांचे सामाजिक विचार असतात. मात्र डॉक्टर झाल्यानंतर काही जणांसाठी पैसा कमावणे हेच सर्वांत महत्त्वाचे बनते. मोठे हॉस्पिटल उभे करणे चुकीचे नाही. आधुनिक सुविधा देणेही चुकीचे नाही. डॉक्टरांनी पैसे कमावणेही चुकीचे नाही. पण रुग्णाची मजबुरी लक्षात घेऊन त्याच्याकडून अवाजवी पैसे घेणे योग्य नाही.
रुग्ण हा केवळ पैसे देणारा माणूस नाही. तो कोणाच्या तरी घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे. त्याच्या मागे संपूर्ण कुटुंब असते. डॉक्टरांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. उपचाराचा योग्य खर्च घेणे आणि रुग्णाची लूट करणे यात मोठा फरक आहे. सर्व डॉक्टर असे आहेत, असे म्हणता येणार नाही. आजही अनेक डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करतात. गरीब रुग्णांना मदत करतात. मात्र काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र बदनाम होते. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर शासकीय यंत्रणांनी लक्ष देणे आणि तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.
डॉक्टरांनीही स्वतःला एक प्रश्न विचारावा- आपण डॉक्टर का झालो ? पैसा कमावण्यासाठी की माणसांची सेवा करण्यासाठी? पैसा कमावणे गरजेचे आहे. पण रुग्णाच्या आजारातून, भीतीतून आणि मजबुरीतून पैसा कमावणे योग्य नाही. रुग्णालयात आलेल्या माणसाकडे फक्त बिल म्हणून पाहू नका. त्याच्या मागे एक कुटुंब आहे, त्याची चिंता आहे आणि तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे.
डॉक्टरकी करा. योग्य मोबदला घ्या. मोठे हॉस्पिटल उभे करा. पण रुग्णांची लूट करून नाही. कारण डॉक्टरकीची खरी किंमत मोठ्या बिलात नाही तर रुग्णाला योग्य उपचार देऊन त्याला बरे करून घरी पाठवण्यात आहे.


