कर्जत : दुचाकीला बलेनोची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारातील आरडे वस्ती जवळ रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन दुचाकीस्वारास जखमी केल्याप्रकरणी बलेनो कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्ञानदेव अजिनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे भाऊ सत्यवान जाधव हे टीव्हीएस स्टार सिटी दुचाकी क्रमांक एमएच १६ बीयू ११०२ वरून जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या बलेनो कार क्रमांक एमएच १६ बीवाय ७०७५ वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत सत्यवान जाधव यांच्या डाव्या पायाच्या तळपायाला गंभीर दुखापत झाली. तसेच डोक्याला, चेहऱ्यावर व शरीरावर खरचटले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत असताना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, बलेनो चालकाने कार घटनास्थळी सोडून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास कर्जत पोलीस करीत आहेत.