राशीनमधील सोलर वाहिनी व अतिउच्च दाब वीजवाहिनीच्या कामाविरोधात ३१ ऑगस्टला आमरण उपोषण

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथील ‘रेन्सन इन्फ्राकॉम प्रा. लि.’ कंपनीच्या बेकायदेशीर कामासह अतिउच्च दाब वीजवाहिनी व सोलर पोल उभारणीच्या कामाबाबत तसेच १४ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी हनुमंत सुळ तसेच बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर (गृह शाखा) यांचे पत्र दि. १३ जून २०२६ तसेच उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांचे पत्र दि. १२ ऑगस्ट २०२६ या संदर्भांनुसार राशीन येथे ‘रेन्सन इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमार्फत अतिउच्च दाब वीजवाहिनी व सोलर पोल उभारणीचे काम सुरू आहे.

या कामामुळे बाधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय विभागांकडून या कामासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती किंवा अहवाल शेतकऱ्यांना देण्यात आलेला नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राशीन-भिगवण रोडवरील करपडी फाट्यानजीक चौकीचा लिंब येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र, आंदोलनावेळी कर्जत तालुक्यातील महसूल व संबंधित प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेधही करण्यात आला आहे.

दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने तसेच प्रशासनाकडून योग्य कायदेशीर उत्तर मिळाले नसल्याने ३१ ऑगस्ट रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांकडून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा किंवा उपोषणकर्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर व प्रशासकीय जबाबदारी महसूल प्रशासन, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘रेन्सन इन्फ्राकॉम’ कंपनीची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच या विषयासंदर्भातील प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.