मेडिकल स्टोअर्सच्या तक्रारींवर अन्न व औषध प्रशासनाची उदासीनता : कमलाकर शेटे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील खासगी मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटलमधील औषध विक्री तसेच लॅबमधील विविध बाबींविरोधात युवक क्रांती दलाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदन देण्यात आले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी खासगी हॉस्पिटल्सना आवश्यक निर्देश दिल्याने थोडी हालचाल सुरू झाली आहे.

मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर संबंधित सहाय्यक आयुक्त (औषध ) कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. कार्यालयाच्या दर्शनी फलकावर नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सहाय्यक आयुक्त यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले. मेडिकल स्टोअर्ससारखा जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित विषय असताना संबंधित अधिकाऱ्यांची अशी अनुपस्थिती आणि संपर्काचा अभाव गंभीर बाब आहे.

प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. सध्या तरी कारवाईबाबत उदासीनता दिसत आहे. अन्यथा युवक क्रांती दलाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, असे खेड येथील कार्यकर्ते कमलाकर शेटे यांनी म्हटले आहे.