
कर्जत नगरपंचायतच्या जुन्या हद्दीत असलेल्या कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांना प्राधान्याने गाळे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी जुन्या नगरपंचायत रोडवरील गाळेधारक व्यावसायिकांनी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अनेक गाळेधारक गेल्या २० ते २५ वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला असू मुलांचे शिक्षण, घरभाडे, लाईट बिल यांसह विविध खर्च भागवित आहेत.

गाळेधारकांच्या म्हणण्यानुसार, जर त्यांना सध्याच्या गाळ्यांमधून स्थलांतरित करण्यात आले तर त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे नगरपंचायत कॉम्प्लेक्समधील गाळ्यांमध्ये प्राधान्यक्रमाने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नगरपंचायतीचे नियमानुसार असलेले वार्षिक अथवा मासिक भाडे भरण्यास सर्व गाळेधारक तयार असून कॉम्प्लेक्समध्ये गाळे उपलब्ध करून दिल्यास सध्याचे अतिक्रमण स्वतःहून काढण्याची तयारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने गाळे वाटपाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या २० ते २५ वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या जुन्या व्यावसायिकांचा विचार करून त्यांना थेट गाळे वाटप करण्यात यावे अशी मागणी कांतीलाल तोरडमल यांनी केली आहे. जुन्या गाळेधारकांनी अनेक वर्षे व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह केला असून त्यांच्या अनुभवाचा व जुन्या व्यवसायाच्या कालावधीचा विचार करून त्यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी मुख्याधिकारी व नगरपंचायत प्रशासनाकडे दोन ते तीन वेळा निवेदने देण्यात आली असून, या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जुन्या व्यावसायिकांना व्यवसायापासून विस्थापित होण्यापासून वाचवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

