
कर्जत शहरातील काही खासगी हॉस्पिटल व वैद्यकीय लॅबमध्ये रुग्णांकडून उपचार आणि विविध वैद्यकीय तपासण्यांसाठी जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आरती भारती यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात कर्जत शहरातील संबंधित हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचे नाव, डॉक्टरांचे नाव, शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी क्रमांक, उपलब्ध सुविधा व शुल्क यांची आवश्यक माहिती रुग्णांना सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित केली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपचार, ऑपरेशन, विविध तपासण्या व इतर वैद्यकीय सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या संभाव्य खर्चाची माहिती उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना दिली जाते का, याचीही पडताळणी करावी, असे निवेदनात नमूद आहे.

रुग्णांच्या बिलांची तपासणी करून प्रत्येक शुल्क स्पष्टपणे नमूद केले आहे का आणि नियमांच्या विरोधात जादा किंवा अवाजवी शुल्क आकारले जात नाही ना, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी व इतर तपासण्यांसाठी आकारण्यात येणारे शुल्क लागू नियमांनुसार आहे का, याचीही तपासणी करावी. औषधांच्या बिलांमध्ये औषधाचे नाव, प्रमाण व किंमत नमूद केली जाते का, डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता व वैध वैद्यकीय नोंदणी आहे का, रुग्णांना आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे व तपासणी अहवाल दिले जातात का, याची पडताळणी करण्याची मागणी आहे.
कर्जत शहरातील खासगी वैद्यकीय लॅबकडे आवश्यक परवाने, नोंदणी व मान्यता आहेत का, याची संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत तपासणी करून नियमभंग आढळल्यास कारवाई करावी. नागरिकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून त्यावर योग्य निर्णय घ्यावा आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते पोपटराव खोसे, आप्पा अनारसे, प्रा. किरण जगताप, ॲड. शरद होले, दादा राऊत यांनी वैद्यकीय अधीक्षक आरती भारती यांच्याशी संवाद साधला.

