आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर !

कर्जत : प्रा. किरण जगताप

बऱ्याच वेळा खरं बोलण्यापेक्षा बरं बोलण्याने माणसं सुखावतात. ती दुखावली जाऊ नयेत म्हणून आपण सारखं बरं बोलत असतो. पण या सततच्या बरं बोलण्यामुळे खरं बोलणं मागे पडतं आणि लोकांचे खरे प्रश्न पुढेच येत नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही आरोग्य क्षेत्रातील सुविधा आणि अडचणींचा पाठपुरावा करत आहोत. आमच्याकडे याविषयी अनेक तक्रारी येत होत्या. त्यातील काही बाबी आम्ही प्रत्यक्ष पाहिल्या. म्हणूनच या विषयात आम्ही संघटना आणि जागृत नागरिक म्हणून उतरलो आहोत. हा कुणा व्यक्तीविरोधातला लढा नाही किंवा कुणाविषयीचा आकस नाही. हा आपल्या चुकीच्या व्यवस्थेविरोधातला लढा आहे. सामान्य लोकांच्या पाठिंब्याने आम्ही हा लढा ताकदीने लढत आहोत. सामान्य माणसाचे आरोग्य व्यवस्थेबाबत तळमळीचे प्रश्न आहेत. ते आम्ही पुढे आणत आहोत.

या प्रश्नांबाबत गेल्या महिनाभरात अनेक चांगली माणसं भेटली. पाठिंबा देणारे अधिकारी भेटले, तसेच डॉक्टरही भेटले. त्यांनी या विषयात मार्गदर्शन केले आणि अनेक गोष्टी सांगितल्या. आरोग्य हा प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणूनच सामान्य लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जसे पाठिंबा देणारे डॉक्टर भेटले, तसेच विरोध करणारेही आहेत. त्यांच्यावरही आमचा वैयक्तिक राग नाही. पण काही डॉक्टरांचा मिळत असलेला पाठिंबा आणि त्यांची भूमिका या लढ्यासाठी महत्त्वाची आहे. सामान्य लोकही अशा डॉक्टरांची नावे आदराने घेतात.

आपल्याच भागात आरोग्य क्षेत्रात काम केलेली जागतिक दर्जाची माणसं होऊन गेली. डॉ. रजनीकांत आरोळे आणि डॉ. माबेल आरोळे यांना जागतिक पातळीवरील रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. आरोळे कुटुंबीय आजही आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. कोरोना काळात याच भागातील अनेकांचे जीव त्यांनी वाचवले. तसेच अनेकांचे लाखो रुपये वाचले.

कर्जतमध्येही डॉ. काकडे यांच्यासारखे अनेक चांगले डॉक्टर होऊन गेले. आजही चांगले डॉक्टर काम करत आहेत. जशी आरोग्याच्या खासगी क्षेत्रात लूट सुरू आहे, तशीच बजबजपुरी आरोग्याच्या सरकारी विभागांतही आहे. आजही कर्जत तालुक्यातील बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर नसतात. जे असतात ते किती वेळ उपलब्ध असतात, हेही पाहिले पाहिजे. तिथे सुविधांची आणि स्वच्छतेची मोठी अडचण दिसते.

खरं तर ‘आशा’ कर्मचारी महिलांच्या बळावरच अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे सुरू असल्याचे चित्र आहे. बऱ्याच सरकारी डॉक्टरांची खासगी दवाखाने आहेत. ते सरळ स्वतःच्या नावाने नसले, तरी दुसऱ्या नावाने सुरू असतात. यातून गरीब आणि कष्टकरी लोकांची आर्थिक लूट होते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपासून सर्व स्तरांवर एकमेकांना सांभाळून घेण्याचा आणि त्यातून मलिदा लाटण्याचा प्रकार जाणवतो. हे सर्व गरिबांच्या लुटीतून सुरू आहे.

उपकेंद्रांमध्ये डॉक्टर हवेत. अनेक गावांतील रुग्णांना दररोज गावाबाहेर किंवा तालुक्याच्या ठिकाणी खासगी दवाखान्यात जावे लागते. साथीच्या काळात तर हे प्रमाण खूप वाढते. मोठ्या प्रमाणावर गरिबांना पैसे खर्च करावे लागतात. याच गावातील आरोग्य उपकेंद्रात सरकारी तज्ज्ञ डॉक्टरांची आठवड्यातून एक-दोन दिवस ओपीडी सुरू ठेवली, तर मोठ्या प्रमाणावर गरिबांचा पैसा वाचेल. पण मग डॉक्टरांची खासगी हॉस्पिटल कोण चालवणार?

खासगी लॅबवर तर कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखे आहे. दरफलक, रक्त, लघवी आणि इतर चाचण्यांची फी यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. आरोग्य व्यवस्थेतील या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

आरोग्य, शिक्षण आणि प्रवासी वाहतूक व्यवस्था ही सरकारीच असली पाहिजे. तरच गरीब आणि कष्टकरी समाजात सन्मानाने जगू शकेल. पण सध्या शिक्षणावरील खर्च कमी केला जात आहे. त्यातून मराठी शाळा बंद पडत आहेत. याचा मोठा परिणाम पुढील दहा वर्षांत दिसेल. गरिबांना शिक्षण मिळणार नाही. आरोग्य व्यवस्थेचा बाजार मांडला आहे. आता यात डॉक्टर आणि पेशंट दोघेही टक्केवारीने मिळतात!

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तर मेडिकल आणि हॉस्पिटल यांच्यातील देवाणघेवाण शिवाय व्यवस्था सुरू राहील का? ‘याच कंपनीच्या गोळ्या घ्या, त्याच कंपनीची औषधे घ्या,’ हा अट्टाहास काय सांगतो? सरकारी कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना सामाजिक भावनेतून ग्रामीण आणि आदिवासी भागात काही वर्षे पगारी सेवा देणे बंधनकारक होते. आता तो नियमही सरकार हळूहळू कमी करत आहे. ही सर्व खासगीकरणाच्या बाजाराची प्राथमिक सुरुवात आहे.

या बाजारात गरीबांना आणि कष्टकऱ्यांना उद्या स्थान नसेल. ‘तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे; पैसा नसेल तर तुम्ही जगू नका,’ असा सरळ या सरकारच्या खासगीकरणाचा अर्थ आहे. त्यामुळे या चुकीच्या गोष्टींविरोधात बोललं पाहिजे. आवाज उठवला पाहिजे.

आरोग्य क्षेत्रातील सरकारी असो वा खासगी, कोणत्याही विभागावर सरकारचे किंवा अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे, असे जाणवत नाही. ‘आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही वाटेल तसे वागू; पैशातून अधिकाऱ्यांना विकत घेऊ,’ हीच मस्ती आरोग्य क्षेत्रातील बजबजपुरी दाखवते.

हा लढा कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही. हा लढा शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बाजूचा आहे. याला जर कुणी पक्षपाती म्हणत असेल, तर तो आरोप आम्हाला मान्य आहे! आम्ही आहोत गरिबांच्या बाजूचे! कारण आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून प्रश्नाला वाचा फोडू.

आप्पा अनारसे

संपर्क : 9096554419