आचार्य विनोबा भावे यांचे जीवनकार्य समाजासाठी दिशादर्शक: डॉ. रणजित राऊत

कर्जत : प्रा. किरण जगताप

विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठान, मलठण यांच्या वतीने माहिजळगाव येथे आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक डॉ. रणजित रावसाहेब राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतींस अभिवादन करण्यात आले.

यावेळी विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपट खोसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगावचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, सुहास ढोबे तसेच सचिन कुतवळ उपस्थित होते.
या प्रसंगी युवा शास्त्रज्ञ डॉ. रणजित राऊत यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रनिर्मितीत विनोबांचे योगदान आणि त्यांच्या विचारांचे आजच्या समाजासाठी असलेले दिशादर्शक मूल्य याबाबत प्रेरक माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपट खोसे यांनी केले. शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचचे अध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.