
कर्जत तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांवर युवक क्रांती दलाच्या वतीने सातत्याने आवाज उठविला जात आहे. खासगी रुग्णालये आणि लॅब चालक रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची वसुली करत असल्याच्या तक्रारींबाबत प्रशासनाला निवेदने देऊन हा प्रश्न मांडला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, या भूमिकेतून सुरू असलेल्या या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर युक्रांदच्या वतीने जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला भेट देण्यात आली. या भेटीत डॉ. रणजीत राऊत आणि समीर शेख यांनी प्रकल्पाचा इतिहास, त्यामागील विचार आणि सध्या सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आरोग्याच्या प्रश्नाकडे केवळ उपचाराच्या दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पाहण्याची गरज या भेटीत प्रकर्षाने जाणवली.

डॉ. रजनीकांत आरोळे आणि डॉ. मेबल आरोळे यांनी जामखेड परिसरात १९७०- ७१ च्या सुमारास ग्रामीण आरोग्य प्रकल्पाची सुरुवात केली. ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे, आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू होता. गावातील नागरिकांचा आरोग्यसेवेत प्रत्यक्ष सहभाग वाढवून आरोग्याच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातील महिलांना आरोग्यविषयक प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून कुटुंबांपर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचविण्यात आली. जामखेडमध्ये विकसित झालेली ही कार्यपद्धती आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाचे उदाहरण ठरली.

सध्या या प्रकल्पामध्ये अल्प दरात उपचार केले जात असून वेळोवेळी मोफत शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जाते. कोरोना काळात शेकडो रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. हे कार्य कधीही विसरता येणार नाही. डॉ. रवी आरोळे, डॉ. शोभा आरोळे, जयेश कांबळे आणि त्यांचे सहकारी हे कार्य पुढे नेत आहेत. विविध भागांतील विद्यार्थी येथे येऊन आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक कार्याचे धडे घेत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प केवळ उपचार देणारे ठिकाण न राहता सामाजिक सेवा आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणूनही कार्य करत असल्याचे या भेटीत जाणवले. मानवतेचा धर्म पाळत परदेशातील डॉक्टर्स येथे येऊन रुग्ण सेवा करतात. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

युक्रांदच्या कर्जत आणि जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी हा अभ्यासदौरा केवळ एका आरोग्य प्रकल्पाची पाहणी नव्हती, तर आरोग्यसेवेचा व्यापक अर्थ समजून घेण्याची संधी होती. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यसेवा कशी उभी करता येते, लोकसहभागातून आरोग्याच्या समस्या कशा सोडविता येतात आणि वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे महत्त्व काय आहे, याची जाणीव या भेटीतून झाली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अशा कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. कर्जत तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काळात अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची प्रेरणा या अभ्यासदौऱ्यातून मिळाली. त्यामुळे जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पाची ही भेट आमच्यासाठी अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली.

