
कर्जत तालुक्यातील खासगी रुग्णालये आणि लॅबमध्ये रुग्णांच्या हक्कांबाबत पारदर्शकता असावी, उपचारांचे दरपत्रक व डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता दर्शनी भागात लावावी, रुग्णांकडून जादा शुल्क आकारू नये, अनावश्यक तपासण्या व उपचार लादू नयेत, तसेच रुग्णांना स्पष्ट व तपशीलवार बिल आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे मिळावीत आदी मागण्यांसाठी युवक क्रांती दलाने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे २४ ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. निवेदनानंतर आरोग्य विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, फक्त पत्रे काढणे आणि कागदोपत्री सूचना देणे म्हणजे रुग्णांच्या समस्या सुटणे नव्हे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार फलक लागले आहेत का, नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी करून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी युवक क्रांती दलाची भूमिका आहे.

कर्जतच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा यंत्रणांवर प्रभाव असल्याचे दिसत नाही. त्यांच्या आदेशाला डॉक्टर्स आणि लॅब चालकांनी केराची टोपली दाखवल्याचे सध्याचे चित्र आहे. निवेदन आले म्हणून त्यांच्याकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप आहे. गंभीर तक्रारी असताना प्रत्यक्ष तपासणी, नोंद आणि त्या अहवालानुसार पुढील ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.

‘युक्रांद’ची ही मोहीम सर्व डॉक्टरांच्या विरोधात नाही. कर्जत तालुक्यात अनेक डॉक्टर रुग्णांना अल्पदरात, प्रामाणिकपणे आणि सामाजिक बांधिलकीने सेवा देत आहेत. अशा डॉक्टरांच्या कार्याचा आम्ही आदर करतो. या मोहिमेला चांगले काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांचा पाठिंबा असून, तालुक्यातील अनेक डॉक्टर आमच्या संपर्कात आहेत. चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांसोबत युक्रांद कायम आहे.
कर्जत तालुक्याच्या आरोग्य विभागाला आमचा सरळ प्रश्न आहे. रुग्णालयात माहितीचे आवश्यक फलक प्रत्यक्षात कधी लागणार? शासकीय नियमांचा भंग करणारी हॉस्पिटल्स, लॅब यांच्यावर कारवाई कधी होणार? हेच प्रश्न थेटपणे विचारण्यासाठी आणि आरोग्य विभागातील निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी आम्ही येत आहोत. २१ सप्टेंबर रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर लक्षवेधी एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा घंटानाद कोणत्याही प्रामाणिक डॉक्टरांविरोधात नाही. तालुक्याच्या आरोग्य विभागाने फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष ॲक्शन मोडमध्ये काम करावे यासाठी आहे. घंटानाद करूनही आरोग्य विभागाला जाग आली नाही, तर आम्ही आंदोलनाची मालिका सुरूच ठेवणार आहोत. आठवड्याला, पंधरा दिवसाला तालुक्याच्या कार्यालयासमोरच नव्हे तर जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलने, निदर्शने करत राहू. रुग्णांना आपल्या हक्कांबाबत जागृत करणे, शासकीय यंत्रणांना जाब विचारणे, हे काम आम्ही सुरूच ठेवणार आहोत.

