
कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील मयूर बाळासाहेब जांभळे आणि आकाश बाळासाहेब जांभळे याची भांबोरा येथील शेतातून मोटारपंपासाठी वापरण्यात येणारी सुमारे ३०० फूट लांबीची विद्युत केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांबोरा येथील शेत गट क्रमांक ३०२ मध्ये विद्युत मोटार बसविण्यात आलेली आहे. स्टार्टरपासून मोटारीपर्यंत पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर दिशेने टाकण्यात आलेली सुमारे ३०० फूट लांबीची केबल शेतात होती.

दि. २० सप्टेंबर रोजी संबंधित शेतकरी शेतातील काम आटोपून घरी गेले. त्यानंतर दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता शेतात गेले असता मोटारीची केबल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने केबल कापून चोरी केली आहे.
या चोरीमुळे केवळ केबलचे नुकसान झाले नसून केबलअभावी शेतातील पाण्याचा पुरवठाही बाधित झाला असून आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या केबलची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

