
युवक क्रांती दलाच्या वतीने कर्जत शहरातील काही खासगी रुग्णालये व वैद्यकीय लॅबमध्ये रुग्णांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक आरती भारती यांनी कर्जत शहरातील १८ खासगी रुग्णालयांना लेखी नोटिसा बजावल्या आहेत.

या नोटिसांमध्ये रुग्णालयात डॉक्टरांचे नाव, शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी क्रमांक, उपलब्ध सुविधा, शुल्क व इतर आवश्यक माहिती दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपचार सुरू करण्यापूर्वी संभाव्य खर्चाची माहिती रुग्ण किंवा नातेवाईकांना देणे, तसेच आकारलेल्या प्रत्येक शुल्काचा स्पष्ट तपशील बिलामध्ये नमूद करणे आणि जादा किंवा अवाजवी शुल्क आकारू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी यांसह विविध वैद्यकीय तपासण्यांचे शुल्क लागू नियमांनुसार आकारावे. अनावश्यक तपासण्या व उपचार करू नयेत, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांची स्वतंत्र व स्पष्ट बिले दिली जातात का ? बिलामध्ये औषधाचे नाव, प्रमाण व किंमत स्पष्टपणे नमूद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कर्जत शहरातील खासगी वैद्यकीय लॅबकडे आवश्यक परवाने, नोंदणी व मान्यता आहेत का, तसेच संबंधित कायदे व नियमांचे पालन केले जाते का, याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्ण हक्कांची सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावावे आणि त्याचे छायाचित्र पुराव्यासह कार्यालयात सादर करावे, असे नोटिसीत नमूद आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट, १९४९ मधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित कार्यवाही ७ दिवसांच्या आत म्हणजेच २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
युवक क्रांती दलाच्या निवेदनानंतर कर्जत शहरातील १८ रुग्णालयांना लेखी नोटिसा बजावण्यात आल्याने रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या उपचार शुल्काच्या प्रश्नावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे.
नोटीस देण्यात आलेली कर्जत शहरातील १८ हॉस्पिटल अशी:
१) केशर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्जत, २) विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्जत, ३) श्री साई हॉस्पिटल, कर्जत, ४) पवार हॉस्पिटल, कर्जत, ५) सुमन मॅटर्निटी हॉस्पिटल, कर्जत, ६) करपे हॉस्पिटल, कर्जत, ७) सदगुरू हॉस्पिटल, कर्जत, ८) आनंद हॉस्पिटल, कर्जत, ९) गंगाई हॉस्पिटल, कर्जत, १०) राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्जत, ११) साई सिद्धी हॉस्पिटल, कर्जत, १२) काकडे हॉस्पिटल, कर्जत, १३) ओम साई हॉस्पिटल, कर्जत, १४) अरुणोदय नेत्रालय, कर्जत, १५) साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्जत, १६) क्षितिजा बाल रुग्णालय, कर्जत, १७) श्री हॉस्पिटल, कर्जत आणि १८) सिद्धीविनायक हॉस्पिटल, कर्जत यांचा समावेश आहे.

