वैद्यकीय व्यवसायाबाबत सोशल मीडियावर संभ्रम;डॉक्टर, केमिस्ट व पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

कर्जत : प्रा. किरण जगताप

वैद्यकीय व्यवसाय व कार्यप्रणालीबाबत सोशल मीडिया तसेच समाजामध्ये लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशन, कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन आणि कर्जत तालुका पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनने कर्जतचे तहसीलदार, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या सोशल मीडिया व समाजामध्ये काही संघटना वैद्यकीय व्यवसाय व त्यांच्या कार्यप्रणालीविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय (हॉस्पिटल्स) व त्याची कार्यप्रणाली तसेच त्याच्याशी संलग्न असलेल्या औषधशास्त्र (मेडिकल) व प्रयोगशाळाशास्त्र (लॅब) यांच्याबाबत टीकात्मक व उपहासात्मक चर्चा केली जात आहे.

यामुळे समाजामध्ये व लोकांच्या मनामध्ये या अतिशय संवेदनशील व्यवसाय व कार्यप्रणालीविषयी मत्सर व तिरस्कार निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर व रुग्ण यांच्यातील असलेल्या संवेदनशील नात्यास तडा जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

“आपण त्याची योग्य ती दखल घेऊन संबंधित संघटना तसेच सोशल मीडिया यांना योग्य तो समज द्यावी,” अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, अशा बदनामीमुळे सर्व वैद्यकीय व्यावसायिक, औषधशास्त्र व्यावसायिक (मेडिकल) व प्रयोगशाळा व्यावसायिक (लॅब) लक्षणीय बंद ठेवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आरोग्य उपचाराच्या बाबतीत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशन, कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन आणि कर्जत तालुका पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.