
कर्जत तालुक्यातील खेड–शिंपोरा रस्त्यावरील भीमा नदीच्या बॅकवॉटरवरील नांदणी पूल दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे भीमा नदीला आलेल्या पुरात वाहून गेला. या घटनेला दीड वर्ष उलटत आले असतानाही पूलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पूल वाहून गेल्यामुळे नदीच्या अलीकडील व पलीकडील गावांमधील दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. विद्यार्थी, शेतकरी तसेच नागरिकांना नदीपार जाण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित मार्ग बंद झाल्याने होडीने लाईफ जॅकेट घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

नांदणी पूल हा परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. पूल नसल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी तसेच नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन नांदणी पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलाचे काम मंजूर करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान या पूलाचे काम तातडीने सुरू न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव शेटे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर जिल्हा संघटक भाऊसाहेब जावळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकुश साळवे, राशीन शहराध्यक्ष दादा आढाव, खेड शहराध्यक्ष कृष्णा सरतापे, खेड शहर युवक अध्यक्ष शिवदास अडसूळ, तालुका सचिव हरिभाऊ कोकाटे, ॲड. शुभम पानसरे, ज्येष्ठ नेते संजय काळे आणि रामचंद्र खंडागळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

