
कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर चरपटीनाथ (पप्पूशेठ) धोदाड यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात वकील संदीप शिवदास पाटील व विजय सुनील पाटील यांच्यासह आरोपींनी दाखल केलेला जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी फेटाळून लावला. या प्रकरणी दि. २७ जून २०२६ रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, शेतात काम सुरू असताना आरोपी तेथे आले. यावेळी वकील संदीप पाटील यांनी सुती दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा तर विजय सुनील पाटील यांनी दोन्ही हात पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यादरम्यान फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर घराशेजारील नागरिक व कुटुंबीय घटनास्थळी आल्याने त्यांचा बचाव झाल्याचे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर कर्जत व अहिल्यानगर येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरोपींकडून श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. आरोपींच्या वतीने ॲड. सुमीत पाटील यांनी बाजू मांडली. तर फिर्यादी चरपटीनाथ (पप्पूशेठ) धोदाड यांच्या वतीने करमाळा येथील विधिज्ञ ॲड. गणेश सिरसकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी जामीन अर्ज नामंजूर केला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपींकडून पुढील कायदेशीर उपाय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर जमीन व्यवहाराशी संबंधित खरेदीदार पप्पूशेठ धोदाड कुटुंबातील सदस्य तसेच विक्रेते गायकवाड व सराटे कुटुंबीयांविरुद्ध विविध तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे वकील संदीप पाटील याने दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे खोट्या केसेस व तक्रारींचा आहे . वकील संदीप पाटील यांनी वकीली ज्ञानाचा दुरुपयोग करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सदर आरोपांची स्वतंत्र चौकशी व न्यायालयीन परीक्षण होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण वादाला जमीन व्यवहाराची पार्श्वभूमी असल्याने, हल्ला प्रकरणासोबतच त्यानंतर दाखल झालेल्या विविध तक्रारींची वस्तुस्थितीही तपासण्यात यावी. आणि ती न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून स्पष्ट होणार असल्याची माहिती चरपटीनाथ धोदाड यांनी दिली.
चरटीनाथ धोदाड यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करणार आहे.
– ॲड. संदीप पाटील

