
SIR प्रक्रियेदरम्यान काही BLO यांनी प्रत्यक्ष मतदारांची खातरजमा तसेच घरभेटी न घेता एकाच ठिकाणी बसून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्याचा गंभीर आरोप कृष्णा पिसाळ यांनी केला आहे. संबंधित इतिवृत्तातील स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांबाबतही आक्षेप घेण्यात आला असून प्रत्यक्ष बैठक व सर्वेक्षण झाले होते का याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाशी संबंधित उपलब्ध कागदपत्रे, इतिवृत्त, स्वाक्षऱ्यांबाबतचे पुरावे, तक्रारी तसेच इतर कागदपत्रे कृष्णा पिसाळ यांनी तहसीलदार, कर्जत आणि प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. तसेच निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार, तहसीलदार व प्रांताधिकारी यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर तक्रार करण्यात आली आहे.

SIR सर्वेक्षणातील कथित त्रुटी जाणीवपूर्वक झाल्या आहेत का, संबंधित BLO यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाली आहे का किंवा या प्रक्रियेत कोणत्याही अधिकाऱ्याचा हस्तक्षेप झाला आहे का याबाबत सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नसून ही बाब निष्पक्ष चौकशीचा विषय असल्याचे कृष्णा पिसाळ यांनी म्हटले आहे.
प्रत्यक्ष सर्वेक्षण झाले असल्यास त्यासंदर्भातील GPS लोकेशनसह छायाचित्रे, बैठकींचे फोटो, घरभेटीच्या नोंदी, मॅपिंग रेकॉर्ड, नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी तसेच SIR प्रणालीतील डिजिटल ऑडिट ट्रेल तपासण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित BLO आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत कृष्णा पिसाळ व दत्तात्रय पिसाळ यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे उपलब्ध असलेले सर्व पुरावे संबंधित तहसीलदार, कर्जत तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत. आता या पुराव्यांची निष्पक्ष तपासणी करून प्रत्यक्षात काय घडले, SIR प्रक्रिया नियमानुसार झाली का आणि झालेल्या कथित त्रुटींमागे कोणाची जबाबदारी आहे, हे स्पष्ट करावे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित BLO अथवा प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी केली जाते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

