
कर्जतमध्येअनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात कर्जत तालुक्यातील भीम सैनिकांच्या वतीने भव्य संविधान सन्मान जनआक्रोश मोर्चा व संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली आहे. हा मोर्चा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.

या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आक्काबाई नगर, कर्जत येथून होणार असून मोर्चा तहसील कार्यालय, कर्जत येथे पोहोचणार आहे. त्यानंतर येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक समस्त भीम सैनिक, कर्जत तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा संदेश देत आरक्षणाच्या हक्कासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी

