
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपा युवा मोर्चा कर्जत तालुका यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.

ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आणि संगोपनासाठी अंगणवाडी सेविका सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. शासनाच्या विविध योजना व उपक्रम तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यातही अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा कर्जत तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके, सुनील यादव, उदयसिंग राजपूत, स्वप्नील तोरडमल, रोहित शेळके, अविनाश कलांगे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
समाजातील विविध घटकांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या सेवा संकल्प अभियानाचा उद्देश असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

