हवालदार दिपाली घोडके यांच्या प्रयत्नांतून कलाकाराचे २ लाख ९८ हजार रुपये मिळाले परत

कर्जत : प्रा. किरण जगताप

सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील तमाशावंत कलाकार वसंत चव्हाण यांचे तब्बल २ लाख ९८ हजार रुपये हॅक करून चोरल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीय चिंतेत होते. मात्र सायबर विभागाच्या हवालदार दिपाली मंगेश घोडके यांच्या सहकार्यामुळे या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आणि अखेर वसंत चव्हाण यांना त्यांचे पैसे परत ८ ऑक्टोबर २०२६ रोजी परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

वसंत चव्हाण यांच्या भाची सायबर विभागाच्या हवालदार दिपाली मंगेश घोडके यांच्या सहकार्याने १७ जुलै २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात घोडके यांनी सुरुवातीपासूनच सहकार्याची भूमिका घेतली. त्यांनी वसंत चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानंतर वेळोवेळी त्यांना दिलासा देत धीर दिला.

अखेर हवालदार दिपाली घोडके यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने वसंत चव्हाण यांनी त्यांचे विशेष आभार मानले. संकटाच्या काळात नागरिकांना केवळ आश्वासन न देता त्यांना मदत आणि योग्य मार्गदर्शन मिळणे किती महत्त्वाचे आहे, याचे उदाहरण या घटनेतून समोर आले आहे.

तसेच कोरेगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांनीही या प्रकरणात आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यामुळे चव्हाण यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

सायबर फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन, वेळेवर तक्रार आणि संबंधित यंत्रणांचे सहकार्य मिळाल्यास दिलासा मिळू शकतो, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. वसंत चव्हाण यांनी हवालदार दिपाली मंगेश घोडके आणि बँक ऑफ बडोदा, कोरेगाव येथील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.