कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा कर्जत पोलिसांकडून जेरबंद

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथील राऊतवस्ती परिसरात कोयत्याचा धाक दाखवून घरात जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. राजुऱ्या ऊर्फ राजू सुलाख्या चव्हाण (रा. कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात त्याचे अन्य तीन साथीदार सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चंद्रकला विलास राऊत व त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. फिर्यादी यांच्या मुलांच्या बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी घराजवळ पडलेली शिडी लावून बेडरूममध्ये प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रासह पोत ओढून घेतली. तसेच कानातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देवघरातील सोन्याची मूर्ती व इतर सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी व त्यांच्या मुलांचे मोबाईल फोनही चोरून त्यांची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे सुमारे २ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

घटनास्थळाची पाहणी, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान राजुऱ्या ऊर्फ राजू सुलाख्या चव्हाण याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व कर्जत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेणे तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

– राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी