खातरजमा न करताच प्रांताधिकारी नितीन पाटील यांची विश्वस्त मंडळाला नोटीस : निळकंठ देशमुख

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, तसेच ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशमुख म्हणाले की, ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, मंदिर परिसरातील स्वच्छता, सुलभ शौचालये, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी मोफत पार्किंग आणि मोफत प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना घरबसल्या जगदंबा देवीचे थेट (लाइव्ह) दर्शन घेता यावे, यासाठीही सुविधा उपलब्ध आहे.

मंदिरात दररोज होणारे विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांना पाहता यावेत, यासाठी तीन एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. प्रसाद वितरणाच्या कार्यक्रमावेळी पाच एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

याशिवाय सशुल्क दर्शनाची सुविधा उपलब्ध असून, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनासह विविध विभागांनी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.

‘प्रत्यक्ष पाहणी करूनच नोटीस द्यायला हवी होती’

कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी तक्रारदार योगेंद्र सांगळे यांच्या तक्रारीवरून कोणतीही खातरजमा न करता विश्वस्त मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही बाब योग्य नाही. त्यांनी मंदिर व परिसराची स्वतः किंवा संबंधित विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतरच नोटीस बजावायला हवी होती.

– निळकंठ देशमुख
अध्यक्ष, श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट