कर्जत येथे लोककल्याण बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

कर्जत : प्रा. किरण जगताप

दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी लोककल्याण बांधकाम कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग समूहाचे चेअरमन रोहन भाऊ कदम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना शासकीय योजनांची माहिती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा संकल्प संघटनेने केला आहे.

यावेळी खादी ग्रामोद्योग समूहाचे चेअरमन रोहन भाऊ कदम, राहुल अडसूळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश व्हरकटे, नंदकुमार गाडे, स्वप्निल जाधव, दत्तात्रय चव्हाण, दिपक जाधव, शिरीष भैलुमे आणि प्रथमेश परहर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, पात्र कामगारांना योजनांचा लाभ घेता यावा तसेच नवीन नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय कामगारांना योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठीही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

ज्या बांधकाम कामगारांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी नोंदणीसंदर्भात माहिती घ्यावी. ज्यांचे नूतनीकरण बाकी आहे, त्यांनी ते नियमानुसार पूर्ण करावे. तसेच पात्र असूनही शासकीय योजनांचा लाभ न मिळालेल्या कामगारांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

लोककल्याण बांधकाम कामगार संघटना ही केवळ एक संघटना नसून बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि कल्याणासाठी कार्य करण्याचे एक व्यासपीठ आहे. कामगारांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हा संघटनेचा संकल्प आहे.

या कार्यालयाचे ठिकाण अमरनाथ शाळेसमोर, खादी ग्रामोद्योग समूह कार्यालयाच्या शेजारी, कर्जत येथे आहे. अधिक माहितीसाठी ९१७२४८५०५०, ९६९९१५७३९२ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण जयवंत अडसूळ यांनी केले आहे