
ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागल्याने फळबागांसह खरीप पिके संकटात सापडली आहेत. पाणीटंचाईमुळे सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूटच्या बागा सुकू लागल्या असून, कांदा आणि तूर पिकांचेही नुकसान झाले आहे.

आमदार रोहित पवार यांनी चिंचोली काळदात येथे सीताफळ व ड्रॅगन फ्रूटच्या बागांची, तसेच टाकळी खंडेश्वरी, खंडाळा आणि माहिजळगाव येथील पिकांची पाहणी केली. पाण्याअभावी फळबागा सुकत असून, काही ठिकाणी कांद्याचे पीक जळाले आहे, तर तुरीचे पीकही वाळले आहे.

फळबागा वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा आणि २०१२-१३ मधील निर्णयाच्या धर्तीवर फळबागधारक शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आगामी काळात पाणीटंचाई कायम राहिल्यास शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

