
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, चांडगाव येथील गुणवंत विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने इन्स्पायर मानक अवॉर्डअंतर्गत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या AI मॉडेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने चांडगावसह रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.

या यशाबद्दल श्रद्धा लोंढे व तिचे मार्गदर्शक शिक्षक सुभाष गायकवाड यांचा मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने व बाबासाहेब भोस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्रद्धा लोंढे हिने आपल्या यशाचे श्रेय सुभाष गायकवाड यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला, मेहनतीला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले. भविष्यात जेव्हा जेव्हा या पुरस्काराचा उल्लेख होईल तेव्हा माझ्या नावापूर्वी सुभाष गायकवाड सरांचे नाव घेतले जावे अशी भावनिक विनंती तिने केली.

विद्यार्थिनीने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षकांना दिल्याने उपस्थितांची मने जिंकली. श्रद्धाची जिज्ञासू वृत्ती, नावीन्यपूर्ण विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती यांना योग्य दिशा देत तिला राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यात गायकवाड सरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. मीनाताई जगधने यांनी श्रद्धाच्या यशाचे विशेष कौतुक करत तिच्या कल्पकतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि संशोधनवृत्तीचा गौरव केला. राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणे आणि AI मॉडेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नसून संपूर्ण रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग अहिल्यानगर आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असल्याचे सांगत त्यांनी श्रद्धाच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब भोस यांनीही श्रद्धाच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून तिच्या संशोधनातून समाजोपयोगी आविष्कार घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्षाचे मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, माजी विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेकर आणि विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनीही श्रद्धा व सुभाष गायकवाड सरांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती रुजविण्यासाठी शिक्षक घेत असलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. चांडगाव ग्रामस्थांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त करत श्रद्धा आणि तिचे मार्गदर्शक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य दत्तात्रय वाघ, विनायक रसाळ, रवींद्र मस्के, महादेव म्हस्के, महेंद्र म्हस्के, संतोष म्हस्के, ज्ञानेश्वर दरेकर, अभिमान सोनवणे, प्रा. कल्पना झगडे, गणेश वाळुंज, वृषाली दरेकर, प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, मुख्याध्यापक दिलीप भुजबळ, वर्षा भोईटे, दत्तात्रय मोरे, राजेंद्र खेडकर, विक्रम घालमे, सचिन ससाणे, हौसराव दांगडे यांच्यासह विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी संजय देशमाने यांनी केले. सूत्रसंचालन उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्षाचे प्रमुख सुधीर साबळे यांनी केले तर राजेंद्र म्हस्के यांनी आभार मानले.
श्रद्धा लोंढे हिच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नावीन्यपूर्ण विचारांना नवी प्रेरणा मिळाली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर तिच्या AI मॉडेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही तिच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरली असून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

