
कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्ह्यातून नाव वगळावे, अशी मागणी वालवडचे माजी सरपंच केतन कांतिलाल पांडुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, १३ ऑक्टोबर रोजी मोहटादेवी येथून ज्योत आणून वालवड येथे परतत असताना दुपारी चार वाजता राणी संदीप अवचर यांनी दूरध्वनी करून संध्याकाळी होणाऱ्या भांडणात पडू नका, असे सांगितल्याचा दावा पांडुळे यांनी केला आहे. या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग पेनड्राइव्हमध्ये सादर केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ज्योत तुकाईदेवी मंदिराकडे जात असताना समाजमंदिराजवळ भांडण सुरू असल्याचे समजल्यावर गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

घटनास्थळी सुमारे २०० ते ३०० ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला आहे. संबंधित महिलेने भांडणाबाबत आधीच फोनवरून सांगितले होते, तर मुलांसोबत मारहाण झाल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाशी आपला संबंध नसताना गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपले नाव गुन्ह्यातून वगळावे, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता झालेल्या दूरध्वनी संभाषणाची तपासणी करावी, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, तसेच तक्रारदार महिला, तिची मुले व पती यांच्याविरुद्ध यापूर्वी दाखल गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासावी, अशा मागण्या पांडुळे यांनी केल्या आहेत. आपल्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा गावातील व्यक्तीने दबाव आणला आहे का, याची चौकशी करावी आणि पूर्वनियोजित कट असल्यास त्याचीही तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणाबाबतही प्राथमिक चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, विभागीय पोलीस आयुक्त नाशिक, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधीक्षक कर्जत, मिरजगाव पोलीस ठाणे आणि संबंधित तपास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

