राशीन, कुळधरणमध्ये पालखी दर्शनासाठी भाविकांचा महापूर

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन आणि कुळधरण येथे जगदंबा मातेच्या पालखी उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेला भाविकांचा ओघ विजयादशमीच्या पालखी सोहळ्यातही कायम राहिला. ‘उदो बोला उदो’, ‘आईसाहेबांचा उदो’ आणि ‘जय भवानी’च्या जयघोषाने, ढोल-ताशे, नगारे आणि झांजांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. दोन्ही ठिकाणचे पालखी सोहळे उत्साहात पार पडले.

राशीन येथील जगदंबा मातेचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. रणशिंगाचा निनाद, तोफांची आतषबाजी, चंगाळे- बंगाळे या मर्दानी खेळासह आराधी आणि दिवटीवाल्यांच्या सहभागाने सोहळ्याची रंगत वाढली. मुस्लिम बांधव, सेवेकरी, पुजारी आणि ग्रामस्थही उत्सवात सहभागी झाले.

विजयादशमीच्या दिवशी ग्रामस्थांनी सीमोल्लंघन करून एकमेकांना आपट्याची पाने देत शुभेच्छा दिल्या. रात्री देवीला पारंपरिक पद्धतीने कौल लावण्यात आला. उजव्या बाजूचे फूल प्रसाद म्हणून पडताच भाविकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. त्यानंतर देवीचे मुखवटे पालखीत ठेवून मध्यरात्री मिरवणुकीला सुरुवात झाली.

सकाळी पालखी गावातील मुख्य रस्त्यावर आली. दिवसभर गावातून पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. महिलांनी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. दर्शनासाठी रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेनिमित्त बाजारपेठेत खेळणी, मिठाई, स्टेशनरी आणि विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती.

पोलिस उपअधीक्षक सुजीत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी राशीन येथे पोलिसांच्या वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, बंदोबस्त असूनही काही भाविकांचे मोबाइल चोरीला गेल्याचे समोर आले.

यंदा दुष्काळाचे सावट गडद झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणींचा सामना करत आहेत. या संकटातून जनतेची मुक्तता व्हावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सर्वांच्या जीवनात सुख-समाधान नांदावे, अशी प्रार्थना भाविकांनी जगदंबा मातेच्या चरणी केली.

कुळधरण येथील श्री जगदंबा देवीचा पालखी उत्सवही मोठ्या उत्साहात पार पडला. विजयादशमीच्या रात्री बारा वाजता देवीची पालखी बाहेर काढण्यात आली. ‘आई भवानी’च्या जयघोषात भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत केले.

पालखीचा कल, छत्री धरणे, पूजा आणि आरती यांचे पारंपरिक मान जगताप, सुपेकर, गुंड, पवार, आजबे, शिंदे, लहाडे, गजरमल, भवाळ आदी कुटुंबांकडे आहेत. परंपरेनुसार पालखी गावातील घराघरांसमोर नेण्यात आली. विविध कुटुंबांनी देवीची आरती करून दर्शन घेतले.

दुपारी पालखी देवीचे माहेरघर असलेल्या जगताप वाड्यात नेण्यात आली. तेथे देवीला साडी-चोळी अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. भाविकांना फळांचे वाटपही करण्यात आले. कुळधरणसह धालवडी, सुपेकरवाडी, गुंडाचीवाडी, दुरगाव, कोपर्डी आदी गावातील तरुण मंडळांनी सादर केलेल्या लेझीमच्या डावांनी सोहळ्याची रंगत वाढवली. सायंकाळी पालखी मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर मानाचे वाटप करण्यात आले. श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात कुळधरण येथील पालखी सोहळ्याची सांगता झाली.