राशीन- कर्जत महामार्गावर भीषण अपघात; १० वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू

कर्जत : प्रा. किरण जगताप

दुचाकीवरून राशीन येथून कर्जतकडे परतत असताना दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कर्जत येथील १० वर्षीय स्वराज किशोर भैलुमे याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याची आई आणि मामा यांनाही दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथील किशोर दिलीप भैलुमे यांचा मुलगा स्वराज किशोर भैलुमे हा आपल्या आई व मामासोबत दुचाकीवरून राशीन येथून येत होता. दुचाकीवर तिघे जण प्रवास करत होते. स्वराज हा मध्ये बसला होता. प्रवासादरम्यान अचानक दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून पडली.

या अपघातात स्वराजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई आणि मामा यांना मुकामार लागला आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे भैलुमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमुकल्याच्या मृत्यूने कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

– राहुल अडसूळ, प्रतिनिधी