दुष्काळी परिस्थितीत प्रतिमाणसी ४० लिटर पाणी द्या; शिवसेना तालुकाप्रमुख तोरडमल यांची मागणी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाणीटंचाईच्या कालावधीत ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख नितीन ईश्वर तोरडमल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या शासन निर्णयानुसार, पाणीटंचाईच्या कालावधीत ग्रामीण भागासाठी प्रतिमाणसी २० लिटर, तर नागरी भागासाठी प्रतिमाणसी ३० लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा वापर वाढलेला असल्याने शासनाच्या या निर्णयात बदल करून ग्रामीण व नागरी भागासाठी प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाणी मंजूर करावे, अशी मागणी तोरडमल यांनी केली आहे.

पाणीटंचाईच्या काळात जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही निवेदनातून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या कालावधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात कोणताही शासन निर्णय नसल्याने सरकारी यंत्रणांकडून जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा होत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सध्याच्या पाणीवाटपाच्या निकषांमध्ये बदल करावा, ग्रामीण व नागरी भागासाठी प्रतिमाणसी ४० लिटर पाणी मंजूर करावे आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती विधान परिषद सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत.