कर्जतमधील सत्तेचा तमाशा आणि लोकशाहीची विटंबना !

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणाचा भाग नसून संपूर्ण लोकशाही प्रक्रियेच्या अधोगतीचे गंभीर लक्षण असल्याचे दिसत आहे. नगरसेवकांची निष्ठा, पक्षांतरांची गुप्त व्यूहरचना आणि सत्तेसाठी चाललेली धडपड या सर्व घडामोडी जनतेच्या विश्वासाला नाकारत आहेत.

सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी भाजपाशी हातमिळवणी करत नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. उषा राऊत यांनी अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मजबुरीने पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र संख्याबळाचे राजकीय कारण देत त्यांनी अर्ज मागे घेतला. नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध निवड होणार, असे वाटत होते.

मात्र, गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचा तो निर्णय अमान्य ठरवला व नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला.

सत्तांतराच्या या खेळात नागरी गरजांचे, विकासाच्या मुद्यांचे आणि उत्तरदायित्वाच्या तत्त्वांचे पूर्णतः पतन झाले आहे. सहलीवर गेलेले नगरसेवक, अचानक बदललेली निष्ठा आणि पक्षाविरोधी कारवाया – या सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना धक्का देणाऱ्या आहेत. कर्जत शहरातील फ्लेक्स वॉर हा या राजकीय नाटकाचा अतिरेक ठरतो. ‘पैसा झाला खोटा’ म्हणत भाजप समर्थकांकडून आ. रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका झाली. ‘राष्ट्रवादी’ समर्थकांनी प्रत्युत्तरादाखल त्याला ‘गद्दारांचा आटापिटा…’ अशा आशयाचा फलक लावला. ही भाषा आणि ही पद्धत केवळ हास्यास्पद नाही, तर ती लोकशाही व्यवस्थेचा आणि जनतेच्या अपेक्षांचा अपमान करणारी आहे.

सत्तेसाठी चाललेली ही खेळी कर्जतच्या लोकांना काय देईल? पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण – या मूलभूत समस्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. सत्तेसाठी लागलेली झुंज इतकी तीव्र आहे की ते नागरिकांचे हित पूर्णपणे विसरल्याचे दिसते. लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती नसून, ती सतत जबाबदारीने वागण्याची आणि जनतेशी बांधिलकी ठेवण्याची प्रक्रिया आहे. जर हीच प्रक्रिया राजकीय सौदेबाजी आणि सत्तेच्या स्पर्धेच्या हवाली झाली, तर लोकशाहीचा आत्माच हरवेल.

कर्जतमधील या घडामोडी सर्व राजकीय पक्षांसाठी आणि प्रतिनिधींसाठी एक इशारा आहेत – जनतेच्या मताचा, विश्वासाचा आणि भविष्यातील अपेक्षांचा अनादर केल्यास, तेच लोक उद्या तुमच्या राजकीय नीचपणावर प्रश्न उपस्थित करतील. त्याला उत्तर देण्याची तयारी आजचे विद्यमान व उद्याचे माजी नगरसेवक आणि इच्छुकांना ठेवावी लागेल, हे मात्र नक्की !