गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कर्जत-जामखेडच्या जनतेने कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना डावलून मोठ्या अपेक्षेने युवा नेता म्हणून रोहित पवार यांना निवडून दिले. मात्र, रोहित पवार यांनी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. युवकांच्या रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता पाच वर्षांत झाली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार कधी विधानसभेत बोलले नाहीत, ना त्यांचे प्रश्न मार्गी लावले. २०१९ च्या निवडणुकीत दिलेली अनेक आश्वासने देखील पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले, असल्याचे युवक क्रांती दलाचे तालुका संघटक विनोद सोनवणे यांनी म्हटले आहे.
सोनवणे यांनी पुढे म्हटले आहे, ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमातूनही कोणताही प्रश्न सोडवण्यात आला नाही. पाच वर्षांत रोहित पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नाही, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. गरज नसलेल्या गोष्टींवर त्यांनी लक्ष दिले, मात्र जे महत्त्वाचे होते त्याकडे दुर्लक्ष केले. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसून युवक क्रांती दलाचा पदाधिकारी आहे. २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन दिवस आम्ही जेलमध्ये होतो. मात्र, पाच वर्षांत त्यांनी आमची साधी चौकशीही केली नाही.
स्थानिक मंत्र्याला डावलून रोहित पवार यांना निवडून देणे ही आमची मोठी चूक होती, असे आम्हाला आता वाटते. युवक क्रांती दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निःस्वार्थ भावनेने काम केले, पण पाच वर्षांत त्यांना विचारात घेतले गेले नाही. कर्जत- जामखेडमध्ये रुग्णालयांचा प्रश्न गंभीर असूनही त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. संग्राम जगताप खासदारकीसाठी उभे असताना राष्ट्रवादीने सभा घेतली नव्हती. मात्र, आम्ही युवक क्रांती दलाच्या माध्यमातून राशीन येथे भाजपच्या विरोधात जाहीर सभा घेतली, याकडेही रोहित पवारांनी दुर्लक्ष केले.
पाच वर्षांत मतदारसंघाच्या गरजेच्या गोष्टींवर लक्ष न देता जाहिरातबाजीवर मोठा खर्च करण्यात आला. जनतेला नको असलेल्या गोष्टींचेच कार्यक्रम घेतले गेले. २०२४ च्या निवडणुकीत युवक क्रांती दल योग्य भूमिका घेणार आहे. कर्जत- जामखेडच्या हिताचा उमेदवार असेल त्यांनाच आम्ही मदत करू, अशी आमची भूमिका आहे. लवकरच बैठक घेऊन ही भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.